बुधवार, २० जानेवारी, २०१०

श्री पंत ( http://dhondopant.blogspot.com/ ) याच्या विनंतीला मान देऊन शोध 'मंत्र पुष्पांजलीच्या' मराठी भाषांतराच्या शोधात असताना सापडलेला दुवा मी आपल्या माहीती साठी देत आहे. ’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य) गणपत्युत्सव, श्रीसत्यनारायणाची पूजा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या-प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचा हटकून समावेश असतोच; मग मधल्या इतर आरत्या व प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत. त्यामुळे प्रारंभीची ती आरती व शेवटची मंत्रपुष्पांजली या दोन्ही आपल्याला बर्‍यापैकी पाठ असतात. अर्थात मंत्रपुष्पांजलीचे शब्दोच्चार व तिची चाल हे दोन्ही आपण आपापल्या प्रामाणिक (गैर?)समजुतीप्रमाणे ठरवीत असतो, व आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या घरातील उच्चारपद्धती व चालच सर्वात योग्य आहेत अशी खात्री वाटत असते. मात्र अशा प्रकारे तोंडपाठ असणार्‍या त्यातील मंत्रपुष्पांजलीचा अर्थ मात्र आपल्याला दूरान्वयानेसुद्धा माहित नसतो आणि गंमत म्हणजे बालपणापासून उत्साहाने म्हटल्या जाणार्‍या या प्रार्थनेचा अर्थ न समजून घेताच आपण तिची बिनडोक घोकंपट्टी करून डोळे मिटून (शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेसुद्धा) ती प्रार्थना म्हणतो आहोत हे आपल्या गावीही नसते. मध्यंतरी आमचा एका तरूण मित्र राममोहन याला अचानक साक्षात्कार झाला आणि हा प्रश्न मनात आला की आपण आयुष्यभर वारंवार ईश्वराला उद्देशून म्हणत आलेल्या या प्रार्थनेचा अर्थ काय? त्याने आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हा प्रश्न रिंगणात टाकला. आम्ही सर्व मित्रांनी खूप प्रयत्न केले, महाजालावर तपासले, पण समाधानकारक अर्थ काही सापडला नाही. शेवटी आमच्यापैकी सर्वाधिक वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध मित्र म्हणजे प्रा० राईलकर यांनी त्यांच्या गावचे (चौलचे) बालपणीपासूनचे मित्र प्रा० मा० ना० आचार्य यांच्याकडून तो अर्थ मिळवला. प्रा० आचार्य संस्कृत आणि मराठीचे प्राध्यापक होते आणि दोन्ही भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व आहे. संस्कृतमधील अनेक पुरातन ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला असून त्यातील काहींवर त्यांनी लिहिलेल्या टीकात्मक लेखांचे संस्कृत तज्ज्ञांनीही कौतुक केलेले आहे. मंत्रपुष्पांजलीच्या त्यांनी विशद केलेल्या अर्थाच्या छोट्याशा टिपणावरूनसुद्धा त्यांची कुशाग्र बुद्धी, त्यांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन तिचा उलगडा करण्याचा स्वभाव यांची चुणूक दिसून येते. संस्कृत भाषेची आवड आणि आपल्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा-प्रेम-अभिमान असणार्‍या मंडळींना हे टिपण नक्कीच आवडेल. प्रा० मा० ना० आचार्य यांनी प्रस्तुत केलेला मंत्रपुष्पांजलीचा अर्थ खालील दुव्यावर पहावा. किंवा चित्रावर टिचकी मारावी http://amrutmanthan.files.wordpress.com/2009/11/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-e0a4aee0a482e0a4a4e0a58de0a4b0e0a4aae0a581e0a4b7e0a58de0a4aae0a4bee0a482e0a49ce0a4b2.pdf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: